मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, १५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश, करून बैठका घेण्याचे निर्देश
मुंबई – पुण्यातील हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, पूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे ‘मनपा’, पिंपरी चिंचवड ‘मनपा’, पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि ‘एमआयडीसी’ने योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. विविध समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हिंजवडी ‘आयटी’ पार्कमधील विविध समस्यांबाबत विधानभवनमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आयटी अभियंते, नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात वाहतूक कोंडीत भर पडते ही समस्या सोडविण्यासाठी या भागांत रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा, मेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. कस्पटेवस्ती ते हिंजवडी फेज ३ पर्यंतचा रस्ता वेगळा केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सीटीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. रस्ते रूंदीकरणासाठी योग्य मोबदला देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून भूसंपादन करावे. हिंजवडी एलिव्हेटेड मार्गाचे काम सहा पदरी करून याबाबत १५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाण, म्हाळुंग ते हिंजवडी फेज एक, शनी मंदिर वाकड ते मरूनजी, नांदे ते माण या रस्त्यांच्या रूंदीकरणाच्या कामाला संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे, यामुळे प्रवासी विभागले जावून गर्दी नियंत्रणात राहील. रस्त्यावरील गर्दी रोखता येईल. यासाठी फूटपाथचा विषयी दोन्ही ‘मनपा’ने प्राधान्याने मार्गी लावावा. पाटीलवस्ती ते बालेवाडीरोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य प्रवाहासाठी नियोजन करावे. त्याठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे हाती घ्यावी. सर्व कामांसाठी विभागीय आयुक्त यांनी समन्वय करून बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम झाली तर हिंजवडी परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी मेट्रोची कामेही त्वरित होणे आवश्यक आहे. मेट्रो स्टेशनची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. पीएमआरडीए’चे आयुक्त म्हसे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.