प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात हाही एक पॅटर्न

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटनांचे नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनय क्षेत्रातील कलाकरांचा उल्लेख करत मोठा आरोप केला आहे. त्यामुळे नवीन वादळ निर्माण झाले आहे. याशिवाय धनंजय मुंडे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

बीड जिल्ह्यातल्या गायरान जमिनी ‘आका’ आणि त्यांचे चेलेचपाटे हडप करत असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. हा नवा परळी पॅटर्न आता सर्व जण पाहात आहेत असा आरोही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, आकांचे इथं शंभर एकर आहे. दीडशे एकर आहे. आकांनी इथं प्रचंड खर्च केलाय. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, अजून काय प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडं येतात बरं का हे सगळं जर का बघायचं असेल तर चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर आशा मोठ्या ज्या विभूती आहेत, अश्या मोठ्या विभूती त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात, प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात तर याच्यासाठी अतिशय जवळचा पत्ता जर तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे,’ अशी टीका धस यांनी केली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कुणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा, असा टोला धस यांनी लगावला आहे. दरम्यान सुरेश धस यांनी बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन विविध आरोपांची चाैकशी करण्याची मागणी केली आहे.

महादेव अॅप प्रकरणामध्ये बीडमधील एकाच व्यक्तीच्या खात्यावर ९ अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. त्यासोबतच शिरसाळा गावात शेकडो एकर जमीन लाटल्याचाही आरोप त्यांनी केला.