‘ठरलं तर मग’ मालिकेमधील पूर्णा आजीचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा, उद्या अंत्यसंस्कार

पुणे – मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर उर्फ पूर्णा आजी यांचे निधन झाले आहे. गेल्या २-३ दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज, त्यांनी वयाच्या ६९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

तेजस्विनी पंडितची आई, ज्योती चांदेकर यांचे आज, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले आहे. पुण्यात त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव पौर्णिमा आहे आणि छोट्या मुलीचे नाव तेजस्विनी आहे. ज्योती चांदेकर यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्याती वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात एका हिंदी सिनेमातील छोट्या भूमिकेतून केली. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. गेली ५० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या सिनेसृष्टीत सक्रिय होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या मातोश्री आहेत. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमात त्यांनी सिंधुताई यांची भूमिका साकारली होती. तर, सध्या स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी आपल्या पन्नासहून अधिक वर्षांच्या कारकीर्दीत मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक बहारदार भूमिका साकारल्या. त्यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप सोडली. तसेच ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ज्योती चांदेकर यांना मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.