
मुंबई – सत्ता कोणाचीही असो अजित पवार कायम उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे त्यांना पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हटले जाते. कारण अजित पवार आत्तापर्यंत सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. पण मुख्यमंत्री पदाने मात्र त्यांना हुलकावणी दिली आहे. पण आता मात्र अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली आहे.

नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजितदादा लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत की तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे सभागृहात हास्यकल्लोळ झाला. पण त्याचबरोबर यामुळे राजकीय तर्कही लढवले जात आहेत. आम्हाला प्रचंड विजय मिळाला, तो एकनाथ शिंदे, अजित पवार आणि या सहकाऱ्यांमुळेच. त्यामुळे त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. अजितदादा यांना भविष्यात मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा आहेत. असे म्हणत फडणवीस यांनी आपल्याच विधानसा बळकटी देणारे विधान केले. भाजपाचे आजवरचे राजकारण धक्कातंत्र देणारे राहिले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवार देखील मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अडवणूकीची भूमिका केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपा अजित पवार यांना मुख्यमंत्री देखील बनवू शकते. त्यामुळे फडणवीस यांनी एकप्रकारे शिंदे यांना इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान फडणवीसांच्या विधानावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा नवीन नाही. अजितदादांचे समर्थक नेहमीच त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणत असतात. मात्र पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. पण २०२२ प्रमाणे राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.









