पोलिसांना मोबाईलवरून फोटो काढून दंड आकारता येणार नाही

अपर पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय, अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

मुंबई – वाहन चालवताना नियमांचं उल्लंघन झाल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा हे वाहतूक पोलिस ई-चालान करताना अधिकृत मशिन न वापरता खाजगी मोबाईलवरून दंड आकारत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार वाहने थांबवून स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून फोटो, चित्रीकरण करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अशाप्रकारे स्वत:च्या फोनवरून वाहतूक पोलिस कर्मचारी, अंमलदार यांना दंडात्मक कारवाई करता येत नाही. असे असतानाही हे कर्मचारी वाहनचालकांवर कारवाई करून दंड आकारत असल्याचे पुढे आले आहे. असे न करण्याबाबत यापूर्वीच संबंधित विभागाला आदेशित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही पोलिस अधिकारी, अंमलदार हे स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो, चित्रीकरण करून दंड आकारत आहेत. दरम्यान, या संदर्भात मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना तशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. तक्रारी संदर्भाने तत्कालीन परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वाहनचालक, मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या वैयक्तिक मोबाईलमधून फोटो, चित्रीकरण करण्याच्या प्रकाराबाबत तक्रारी केल्या. त्यानंतर आता संबंधित पोलिसांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. खाजगी मोबाईलवरून फोटो काढल्याने वाहनधारक, मालकांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होते, त्यात गैरवापर होण्याची शक्यता निर्माण होते, असे बैठकीत निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर, उपमहानिरीक्षक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार, यापुढे सर्व दंडात्मक कारवाई अधिकृत कॅमेर्‍यांद्वारे, सिस्टमवर रेकॉर्ड ठेवून आणि रियल टाईम डेटाच्या आधारे केली जावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमलेल्या पोलिस अधिकारी, वाहतूक पोलिसांना केवळ ई-चालान यंत्राचाच वापर करूनच कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.