3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

दाखल गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तानाजी सर्जेराव शेगर असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदननगर पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते. याबबात १७ मे रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासंदर्भात महावितरण विभागात काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्यावर मीटर चोरी केल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास शेगर यांच्याकडे होता. गुन्ह्यात पुढील कारवाई टाळण्यासाठी शेगर यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड अंती तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुणे एसीबीने पडताळणी केली असता शेगर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेगर यांना १९ मे रोजी निलंबित केले होते.

दरम्यान, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त या प्रकरणाची चौकशी करत होते. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी शेगर यांना वेळोवेळी समजपत्र बजावण्यात आले. मात्र, ज्या ज्या वेळी समजपत्र घेऊन पोलीस कर्मचारी घरी जात होते, त्या त्या वेळी शेगर घरी हजर नसायचे. त्यामुळे एकतर्फी चौकशी होऊन त्यामध्ये शेगर दोषी आढळले. त्याशिवाय शेगर यांच्याकडे असलेल्या तपासाच्या गुन्ह्याची त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले.

या सर्व घटना पाहता तानाजी शेगर यांच्या वर्तवणुकीमुळे पोलीस दलाची प्रतीमा मलीन झाली आहे. त्यामुळे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २५ व २६ मधील तसेच भारतीय राज्यघटना  ३११ (२)(ब) अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस उपनिरीक्षक तानाजी सर्जेराव शेगर यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.