जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ;अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त , ५ जणांना अटक

हिंजवडी फेज तीन येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंजवडी पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. आरोपी ऑनलाइन वेबसाईटवर जुगार खेळत असताना हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी २९ जून रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मेगा पोलीस मायस्टीक येथील फ्लॅट नं. १६०४ येथे हि कारवाई केली.

अनुराग अगरदास बंजारे , धनंजय विश्वेश्वर पाल , नवीन संजय गजभिये, अमोस ओस्कर मिंज , राहुल मदनसिंह कुमार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जुगार अड्डा चालवणारा अविनाश वर्मा हा फरार झाला आहे. याबाबत पोलीस हवालदार राजाराम गोकुळदास सराटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ४२०, ४६४, ४६५, ४६८ सह महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज-३ येथील मेगा पोलीस मायस्टीक मधील डि विंग फ्लॅट १६०४ येथे ऑनलाइन जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार तपास पथकाने याठिकाणी छापा टाकला असता आरोपी अविनाश वर्मा याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना जुगार खेळण्यासाठी एक ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध करुन दिली होती. या वेबसाईटवर ऑनलाइन वेगवेगळ्या प्रकरारच्या खेळांवर पैसे लावले जातात. पथकाने छापा टाकला त्यावेळी आरोपी ऑनलाइन जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी अविनाश वर्मा पळून गेला. या कारवाईत १० मोबाईल एक लॅपटॉप असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास एपीआय राम गोमारे करीत आहेत.