नाना पेठेत जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस कारवाईला गेले. पोलीस आल्याचे पासून एकाने दुसर्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला. एका राजकीय व्यक्तीशी संबंधित हा क्लब असल्याचे सांगितले जाते. पोलिसांना तेथे काहीही मिळाले नाही.
ब्रायन रुडॉल्फ गिअर (वय ५२) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. तरीही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने जुगार, मटका सुरु असतो. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला नाना पेठेतील क्राईस्ट चर्चसमोरील लाजवंती कॉम्प्लेक्समध्ये पत्याचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कारवाईसाठी गेले.
तेथे दुसर्या मजल्यावरील दरवाजा बंद होता. पोलिसांनी बेल वाजविली. तेव्हा एकाने सेफ्टी डोअरच्या आतील दरवाजा उघडला. बाहेर पोलीस दिसताच त्याने पुन्हा दरवाजा लावून घेतला. पोलीस आले असा आवाज दिला. त्याचवेळी तेथून खाली काही पडल्याचा आवाज आला. फ्लॅटमधील लोकांनी खाली उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मध्यरात्री मृत्यु झाला.पोलिसांनी या फ्लॅटची झडती घेतली. परंतु, तेथे पत्ते, जुगाराचे साहित्य असे काहीही मिळाले नाही. फ्लॅटमध्ये कोणीही नव्हते. एका राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हा क्लब असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस कारवाईला गेले होते. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.