स्टेटस ठेवत पोलीस अधिकारी गायब, पत्नीची तक्रार अन्….अखेर शोध लागला

लोणीकंद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे हे हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दि. २६ रोजी रात्री ११ च्या सुमारास पोलीस ठाण्यात दिल्याने एकच खळबळ उडाली होती.गुन्हे शोध पथकातील अधिकारी शोधण्याची वेळ लोणीकंद पोलिसांवर आली होती. मात्र अनेक गुन्ह्यांचा उकल करणाऱ्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानेच आपल्या पथकातील अधिकाऱ्याचा शोध घेण्यात यश मिळवले आहे.

न्हावी सांडस तालुका हवेली या ठिकाणावरून शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांचे सहकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकाचा शोध घेतला आहे.लोणीकंद पोलीस ठाण्यातील शोध पथकातील अधिकाऱ्याने दि. २६ रोजी तीन वाजून अकरा मिनिटांनी पुढील काही काळासाठी मला कोणीही कॉल अथवा मेसेज करू नये असे स्टेटस ठेवले होते.

त्यांनतर हा अधिकारी हरवल्याची चर्चा लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाऱ्यासारखी पसरली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हरवलेल्या कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची देखील चर्चा पोलिसात मोठ्या प्रमाणात आहे.तातडीने गुन्ह्यांची उकल करण्यात निष्णात असणारा हा अधिकारी हरवला असल्याने गुन्हे शोध पथकातील एक अधिकारी शोधण्याची वेळ पथकावर आली होती.

मी एवढे चांगले काम करून सुद्धा मला सीनियर साहेब चार चौघात मला ओरडून बोलले. माझा अपमान केला असे बोलून जेवण अर्धवट ठेवून पाच मिनिटात येतो असे सांगून संबंधित पोलीस अधिकारी घरातून निघून गेल्याचा जबाब त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिला होता. या जबाबमुळे पुन्हा एकदा नागरिकांबरोबरच आता अधिकाऱ्यांना देखील अपमानास्पद वागणुकीचा अनुभवातून जावे लागत असल्याचे उघड होऊ लागले आहे. या बाबतीत पोलीस आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाऊ लागली आहे.