
ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे – पिंपरी चिंचवड शहराची सांस्कृतिक, समृद्धीची पंढरी म्हणून ओळख ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ अशा महोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होण्यास मदत होत आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी उल्लेखनीय काम करीत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोगकला महोत्सव २०२५ निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेल्या संस्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये टेल्को कलासागर – टाटा मोटर्स पुणे, कलापिनी तळेगाव दाभाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड, नादब्रह्म संस्था, अथर्व थिएटर्स, दिशा फाउंडेशन, संस्कार भारती, नाटक घर, द बॉक्स, नाटक कंपनी आसक्त पुणे, महाराष्ट्र कल्चर सेंटर (एमसीसी) आदी संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा ‘रंगानुभूती’ हा महोत्सव आहे. या महोत्सवात महाराष्ट्रासह राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश अशा देशाच्या विविध राज्यांतील कलाकार सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरवासियांना चांगल्या प्रकारची सांस्कृतिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. हा महोत्सव ग.दि. माडगूळकर या नाट्यगृहात रंगतोय, ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानाची बाब आहे. कारण ग.दि.मा हे केवळ गीतकार किंवा लेखक नव्हते तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेचे तेजस्वी प्रतिनिधी होते. त्यांच्या नावाने उभ्या केलेल्या या नाट्यगृहात हा महोत्सव होत असल्याने या कार्यक्रमाला एक वेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असेही ते म्हणाले.
महापालिका आयुक्त शेखर सिंह स्वागतपर प्रास्ताविक करताना शहरातील नागरिकांना दर्जेदार कलानुभव, नवोदित व नामांकित कलाकारांना व्यासपीठ आणि सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच या महोत्सवाबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी गांधी, मिलिंद बावा यांनी केले. थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशनच्या अमृता मुळे यांनी आभार मानले.









