प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली

दिल्ली – प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणार पथसंचलन आकर्षकाचे केंद्र असते. पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत नसणार आहे. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात येते. या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचा समावेश असतो. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रत्येक राज्यांच्या चित्ररथाला परवानगी देणे शक्य नसते. यामुळेच प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा चित्ररथ सादर करण्याची संधी देण्यात येते. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात येत असते. तसेच संचलनानंतर निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. गेल्या वर्षी ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ तयार करण्यात आला होता. २०२४ मध्ये मराठी रंगभूमीच्या १७५ व्या सुवर्णमयी इतिहास उलगडणारा चित्ररथ सादर करावा असा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे मांडण्यात आला होता. दरम्यान १९७१ पासून ते २०२४ पर्यंत महाराष्ट्राला १४ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. आतापर्यंत एकूण ७ वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक, तर ४ वेळेस दुसरे पारितोषिक आणि २ वेळेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे. एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही (हॅटट्रिक) राज्याच्या नावावर जमा आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टिका केली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार, गोवा, झारखंड, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरासह १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांचे सादरीकरण केले जाईल. केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीचा चित्ररथ समाविष्ट करण्यात आला आहे.