पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा पवारांकडून आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा, समन्वयाने काम करण्याच्या सुचना, राज्यात किती आहेत कोरोना रुग्ण?

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी डॉ. कंदेवाड यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने सादरीकरण केले. सद्यस्थितीत तपासणीमध्ये ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ7-9 हे उपप्रकार आढळून येत आहेत. या प्रकारामुळे ताप, खोकला, घसा दुखणे असे सौम्य आजार होतात. फक्त रक्तशर्करा, कर्करोग आदी सहव्याधी कमी असलेले, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेले नागरीक आदींना थोडा धोका जास्त आहे. अशांनी गर्दीत जाणे टाळावे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे. श्वसनदाह वाढल्यास त्वरीत जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी व इलाज करावा, असे यावेळी सांगण्यात आले. सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, विभागातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यावेळी होते. त्यांना कोविड व वारीबाबत काळजी घेण्याच्या सूचना व सर्व रुग्णालये कोविडच्या संभाव्य साथीसाठी सज्ज ठेवण्याच्या व सतत माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाच्या परिस्थितीबद्दल अजित पवार म्हणाले की, २०२० प्रमाणे यावेळीही आठवड्याच्या आढावाद्वारे प्रत्येक पातळीवर देखरेख केली जात आहे. आम्ही सर्व विभागांना जबाबदारी देऊन कोरोना नियंत्रित केला होता. आजही रणनीती तशीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला जातो. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर सतत त्यावर लक्ष ठेवून आहेत.

आज महाराष्ट्रात कोरोनाच्या 53 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामध्ये मुंबईमध्ये 24 रुग्ण, पुणे 11, ठाणे 5, पिंपरी चिंचवड 3 तर नागपूर, पुणे ग्रामीण, सागंली आणि रायगडमध्ये प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत राज्यात कोरोनाच्या एकूण 21,067 टेस्ट करण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबई शहरामध्ये जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 829 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.