
पार्थ पवार यांचे राजकीय पुनर्वसन, पक्षात महत्वाची भूमिका बजावणारा, अजित पवारांचा मनात नेमक काय?

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यानंतर २० जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. जवळपास सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार गटानेही आपले उमेदवार मैदानात उभे केले आहेत. यासाठी आता अजित पवार गटाकडून स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. यात पार्थ पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ११ उमेदवार जाहीर केले आहे. अशातच आता पक्षाने या उमेदवारांच्या प्रचारासाठी २० जणांची स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली आहे. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदीक, संजय प्रजापती, युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष चैतन्य मानकर आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंह यांना संधी दिली आहे. मात्र महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याला या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पराभवाचा सामना केल्यानंतर पार्थ पवार राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर त्यांना नव्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. दिल्लीतील ११ उमेदवारांसाठी प्रचार करताना पार्थ पवार यांना त्यांच्या नेतृत्वगुणांचे आणि प्रचारातील कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. ही निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय पुनर्रचना करण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण नऊ मंत्री आहेत, ज्यात आठ कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री आहे. मात्र असं असतानाही दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार वगळता एकाही मंत्र्याचे नाव नाही. त्यामुळे आगामी काळात पार्थ पवार पक्षात महत्वाच्या पदावर दिसण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. १८ जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवाराला वीस जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.









