
लाडकी बहिण योजनेसाठी सरकारचे नवीन निकष, ही अट पूर्ण न केल्यास पैसे बंद होणार?

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण सात हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता महिला लाभार्थी फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष लागू केले आहेत. सरकार आता यासाठी काही कठोर पावले उचलणार आहे. म्हणून, सर्व पात्र आणि गरजू महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून हे नवीन निकष लागू केले जाणार आहेत. योजनेअंतर्गत, लाभार्थी महिलांना आता दरवर्षी जूनमध्ये बँकेत जाऊन ई-केवायसी करून प्रमाणपत्र काढावे लागेल. यासाठी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे. योजनेचा आठवा हप्ता २४ फेब्रुवारीपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाकडे पैसे वर्ग केल्याचे सांगितले जात आहे. मध्यंतरी पैसे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पण अजून निधी वितरणास सुरुवात करण्यात आलेली नाही. महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने सर्व निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्यामुळे राज्याच्या तिजोरीत सध्या ठणठणाट होऊ लागला आहे. निधीची चणचण भासू लागल्यामुळे राज्यातील सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यांपासून महागाई भत्ता मिळालेला नाही.
अर्ज पडताळणी होणार असल्याने, आठव्या महिन्यात पैसे येतील की नाही याची त्यांच्या मनात भीती आहे. खरं तर, ज्या महिलांनी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेतला आहे त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे.









