
कामाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला, गॅस गळती झाल्याने दुर्घटना, परिसरात शोककळा

पुणे – गुढीपाडव्याच्या दिवशीची धनकवडीत आगीच्या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलेंडरमधून गॅसगळती होउन लागलेल्या आगीत एक कामगार ठार झाला आहे.

धनकवडी परिसरातील के के मार्केट नजीक साईबा हॉटेल असून, त्याठिकाणी ३० मार्चला संध्याकाळी सव्वा चारला आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाली. वर्दी मिळताच काञज व गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी पोहोचताच आतमध्ये एक कामगार असल्याचे समजताच पाण्याचा मारा करत कामगारास जवानांनी जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात रवाना केले. तर घटनास्थळी लागलेली आग पुर्ण विझवत धोका दुर केला. शेजारी असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ बसून काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा धोका टळला. आगीमध्ये हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दुध तापवित असताना वायूगळती झालेल्या सिलेंडरमुळे आग लागली व त्याचवेळी कामगारास बाहेर पडता आले नाही. एकुण आठ सिलेंडर घटनास्थळी असून त्यापैंकी तीन मोठ्या प्रमाणात वायुगळती झालेले सिलेंडर अग्निशमन दलाने सुरक्षिततेच्या कारणास्तव ताब्यात घेतले आहेत. संतोष हेगडे असं मृत्यू झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे, या चहाच्या दुकानात आज तो पहिल्याच दिवशी कामावर आला होता. मृत्यू झालेला कामगार सोलापूर जिल्ह्यातील हिजगी गावचा राहिवासी असल्याची माहिती आहे. मृत्यू झालेल्या कामगाराला आई वडील नसल्याची प्राथमिक माहिती देखील मिळाली आहे.
आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्टेशन ऑफीसर सुनील नाईकनवरे, रामदास शिंदे, भरत वाडकर, बांदीवडेकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचार्यांनी प्राधान्य दिले. मृत्यू झालेल्या कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.









