पावसापासून बचावासाठी अंगावर बॅनर घेतल्याने एकाच दुर्दैवी मृत्यू

सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी अंगावर बॅनर घेतल्याने अज्ञात वाहनचालकाला बॅनरखाली झोपलेली व्यक्ती न दिसल्याने डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना सोमवारी (दि.१) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. कपिल विलास अंकुरे असे अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी बसथांब्याजवळील मोकळ्या मैदानात एकाचा खून झाला असल्याची माहिती अशोक नावाच्या व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षास दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना एका बॅनरखाली कपिलचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या डोक्याला दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही मारहाणीच्या खुना नव्हत्या. मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे.