‘अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात’

बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या भाषणाची ग्रामीण शैली स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. यामुळे ते कधी-कधी अडचणीतही आल्याचे दिसते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवार मात्र यावर माैन बागळून होते. पण अजित पवार पुन्हा वादात अडकले आहेत.

अजित पवार बारामतीत एका पेट्रोल पंपाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला गेले होते, त्यावेळी ते बोलत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अनेक कामे झाले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त करत “अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?” अशा शब्दात नागरिक आणि कार्यकर्त्यांना झापले. त्याचबरोबर त्यांनी विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेल्या मलिदा गँगलाही सुनावले ते म्हणाले ‘मी गावाचं नाव नाही घेत. पण इथे रस्ता करणे दहा लाख रुपये, मंदिराचा रस्ता करणे दहा लाख रुपये अशी मागणी केली आहे, पण हे मी सगळं बंद करणार आहे. काय होतंय की, सगळं चिरीमिरीवर चाललेल आहे आणि त्याच्यातून मलिदा गँग तयार होतेय. त्यांनी तर मला नको नको केलय. काहीजण तर कामं घेतात व ती काम दुसऱ्याला विकतात हे मी चालू देणार नाही ‘ असा सज्जड दमच अजित पवार यांनी काम घेणाऱ्या ठेकेदारांना दिला आहे.

संतोष देशमुख प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय आमदार एकवटले त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोर्चे काढले त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस सर्वाधिक आक्रमक राहिले आहेत, पण अद्याप अजित पवार यांनी मात्र काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.