
परभणी – मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मध्यंतरी त्यांनी २५ जानेवारीपासून उपोषण सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यातच आता दाै-यावर असताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे.

पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले की, काही लोक म्हणतात की आता पहिलं सरकार आहे, आरक्षण देतील का?, पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असे म्हणत फडणवीसांना लक्ष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील आज २५ डिसेंबरला परभणी आणि मस्साजोगला जाणार आहोत. मनोज जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यांनी २८ तारखेला बीड जिल्हयातील जनतेच्या वतीने मोर्चा ठेवलेला आहे. त्यातसुद्धा बीड जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच कोणाचे पण बाप येऊ द्या ते मॅटर मी दबू देत नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही. सरकारला एकमेकांना मोबाईलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर, मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच, असे विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.

२५ जानेवारीला राज्यभरात मराठ्यांनी अंतरवलीकडे यायच आहे. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वानी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे. सर्वांनी पत्रिका छापायचा, प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण द्यायचं. २५ जानेवारी २०२५ ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये, त्या दिवशी वाहनेच मिळणार नाहीत, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.









