
माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे यांच्यावर आधारित चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन : लेखिका सुभा लोंढे यांच्यावर उधळली स्तुतीसुमने

पुणे – एखाद्या व्यक्तीचे चरित्र लिहिणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड साधना आणि कठोर मेहनत करावी लागते. केवळ कल्पना करून लिहिले, तर त्यातून दिशा आणि बोध मिळत नाही. त्यामुळे वास्तविकतेला कल्पनेची जोड देऊन लिहावे लागते. चांगला लेखक सर्वोर्थाने विचार करून लिहितो. त्यामुळे त्याचे लेखन वाचनीय ठरते. याची प्रचिती प्रसिद्ध लेखिका सुभा लोंढे यांच्या ‘नितळ मनाची माणसं’ या चरित्रात्मक कादंबरीच्या पानोपानी येते. त्यातील घटना, प्रसंग, किस्से आणि मांडणी कोणत्याही वाचकाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. त्यामुळे ‘नितळ मनाची माणसं’ ही केवळ कादंबरी नव्हे, तर दलित चळवळीचा इतिहास आहे, असे परखड भाष्य जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.

शहरातील स्वारगेट येथील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन सभागृहात आयोजित लेखिका सुभा लोंढे यांच्या ‘नितळ मनाची माणसं’ या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन आणि जेष्ठ पत्रकार राजू बनसोडे यांच्या ‘महा-रिपोर्टर न्यूज’ या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि जेष्ठ लेखक भारत सासणे यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कादंबरीत दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे यांच्या जीवन आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे एका सामान्य कुटुंबातील सफाई कामगार आईचा मुलगा अर्थपूर्ण कांदबरीचा नायक झाला. त्या नायकाला माझा सलाम आहे, असेही गाैरोद्गावार काढून त्यांनी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच लेखिका सुभा लोंढे यांच्या धाडसाचे कौतुक करून ही कांदबरी नवा इतिहास प्रस्थापित करेल, असाही विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना डॉ.सबनीस म्हणाले की, १९७८ साली त्यांनी आयोजित केलेल्या मातंग परिषदेचा उल्लेख करत असे चळवळीला वाहून घेणारे कार्यकर्ते आता दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक घराघरात एक दादासाहेब सोनवणे तयार झाले पाहिजेत असे मत मांडले. यावेळी त्यांनी दादासाहेब सोनवणे यांच्या पत्नीने त्यांना दिलेल्या साथीचे वर्णन करताना त्या आजच्या रमाई आहेत, अशा शब्दात काैतुक केले. तसेच लेखिका सुभा लोंढे यांनी दादासाहेब यांच्या सारख्या व्यक्तीचे जीवन पुस्तकावर उतरवण्याच्या शिवधनुष्य लीलया पेलल्याबद्दल अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनीही सोनवणे यांचे जीवन हे एका कादंबरीत सामावू शकत नाही. तर त्यांच्यावर खंड लिहावा लागेल, असे सांगताना दादासाहेबांनी स्वतः चे चरित्र लिहावे. त्यातून अनेकांना प्रेरणा भेटेल, असेही आवर्जून सांगितले. यावेळी लेखिकेच्या लेखनीचे काैतुक करताना एकदा ही कादंबरी अवश्य वाचावी, असेही आवाहन केले.
यावेळी दादासाहेब सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, चळवळ हा माझा श्वास आहे. मी स्वतः शुन्य आहे फक्त दलित स्वयंसेवक संघामुळे माझी ओळख आहे. पुढे त्यांनी चळवळीत काम करताना आलेले अनुभव सांगताना, त्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. याप्रसंगी लेखिका सुभा लोंढे यांनी दादासाहेब सोनवणे यांचा आणि आपला परिचय कसा झाला हे सांगून, त्यांच्या कार्याचा विस्तार खूप मोठा आणि प्रेरणादायी आहे. तो समाजापुढे आला पाहिजे, या भावनेतून आपण ही कादंबरी लिहिली, असेही सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमाचे औचित्य साधून शाहीर किशोर कसबे, विद्रोही कवयित्री नकुसा लोखंडे आणि डॉ.गंगाधर रासगे यांनी प्रबोधन गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दलित स्वयंसेवक संघाचे राज्य प्रवक्ते सुजित रणदिवे यांनी केले. सोपान चव्हाण यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय झोंबाडे यांनी केले. यावेळी शौर्य अकॅडमीचे संचालक हरिदास भिसे, प्रथमेश शिक्षण संस्थेचे प्रमुख ज्ञानेश्वर कांबळे, अमोल लोंढे, चंद्रकांत नारायणे, तात्या सोनवणे, जनार्दन वाघमारे, अनंत भिसे, स्वाती राहुल उल्हारे, अनुराधा शैलेंद्र पाखरे, अश्विनी किशोर लांडगे, राम लोंढे, प्रभाकर वैराळ, भीमा रामचंद्र सोनवणे, उर्मिला पवार, संजय केंजळे व संतोष माने यांच्यासह सामाजिक चळवळीतले प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.









