
अर्थसंकल्पाकडून अपेक्षा, इंदिरा गांधींनाही जमले नाही ते सीतारामन यांनी करून दाखवले

दिल्ली – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारी २०२५ रोजी नवा इतिहास रचणार आहेत. जो स्वतंत्र भारतात कोणीही करू शकले नाही. अर्थमंत्री १ फेब्रुवारीला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण तरीही त्या एका विक्रमापासून दूरच असणार आहेत.

संसदेत उद्या निर्मला सीतारामन आपला आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर मोरारजी देसाई यांनी आत्तापर्यंत दहावेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. पण त्यांनी वेगवेगळ्या कार्यकाखात ते अर्थसंकल्प सादर केले होते. पण सितारामन यांनी सलग आठ अर्थसंकल्प सादर केल्याने त्या वेगळ्या ठरतात. मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री म्हणून १९५९-१९६४ दरम्यान ६ आणि १९६७-१९६९ दरम्यान ४ अर्थसंकल्प सादर केले आहेत. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनीही वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात अनुक्रमे ९ आणि ८ अर्थसंकल्प सादर केले होते. पण सीतारामन यांचे वैशिष्ट्य म्हणजे निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी २ तास ४० मिनिटे अर्थसंकल्प सादर करत सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम केला होता. उद्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्या मोरारजी देसाईच्या सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या आणखी जवळ जातील. सीतारामन या भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री बनल्या. विशेष म्हणजे त्या पहिल्या पूर्णवेळच्या महिला अर्थमंत्रीही आहेत.
२०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांची देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२४ मध्ये मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतरही सीतारामन यांनी त्यांचे अर्थमंत्रालय कायम ठेवले आहे. दरम्यान सीतारामन यांनी आतापर्यंत एकूण ७ अर्थसंकल्प सादर केले आहेत, ज्यात फेब्रुवारी २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पाचाही समावेश आहे.









