
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील आणखी एक गैरव्यवहार समोर, नियम डावलून.अभिनेत्रीला कर्ज?, खातेदार मात्र संतप्त

मुंबई – न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहार, अनियमितता आणि इतर चुकीच्या कामकाजामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बँकेचे हजारो खातेधारक आज रस्त्यावर आले आहेत. खातेधारकांना आपले पैसे मिळतील की नाही याची चिंता लागून राहिली आहे. त्यातच या बँकेतील आणखी एक घोटाळा समोर आला आहे.

न्यू इंडिया बँकेने नियम डावलून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कर्जावर खुली सूट दिल्याची माहिती उघड झाली आहे. बँकेने अभिनेत्री प्रिती खुंटाला १८ कोटींचे कर्ज दिले होते. तसेच काही काळानंतर ते माफ देखील करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार प्रिती झिंटाने हे कर्ज कॅरेबियन देशांत टी-20 क्रिकेट स्पर्धेतील संघासाठी बोली लावण्यासाठी घेतले होते. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेच्या १,३२९ कोटींच्या एकूण कर्ज वितरणात बड्या कर्जदारांचा (संख्येने जवळपास ५०) वाटा जवळपास निम्मा म्हणजेच ६५६.३६ कोटींचा होता. ज्यापैकी ८५ टक्के कर्ज हे ‘एनपीए’ अर्थात त्याची वसुली पूर्णपणे थकली आहे. यापैकी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांकडे थकीत कर्ज ४१८ कोटींच्या घरात आहे. न्यू इंडियातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बँकेतील गैरव्यवहार मुद्देसूद नमूद केलेले पत्र रिझर्व्ह बँकेला लिहिले. याच पत्राची दखल घेत, रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीत पत्रातील बहुतांश गोष्टी खऱ्या निघाल्याचेही आता स्पष्ट होत आहे.दरम्यान रिपोर्ट्सनुसार २०१० पूर्वी बँकेने लहान कर्जे आणि प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. पण हिरेन भानू यांच्या आगमनानंतर, शाखा व्यवस्थापकांना माहिती नसताना २५ कोटी रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट कर्ज मंजूर होऊ लागली होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) संकटग्रस्त न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना वैयक्तिक आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष पैसे काढण्याची सुविधा देण्याच्या योजनेवर काम करत आहे. खातरजमा झाल्यानंतर बँक ग्राहकांना पैसे देणार आहे.









