
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरात याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. सोशल मीडियावर अशोक खरात याच्या महिलांवर अत्याचार करतानाच्या क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.

अशोक खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावर हत्येचा सुद्धा आरोप झाला आहे. या अशोक खरात प्रकरणात सर्वप्रथम रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलं. अशोक खरातची त्या पूजा करत असल्याचे फोटो व्हायरल झाले. अशोक खरातचा भोंदूगिरीचा दरबार लागायचा. त्यात त्या हजर असल्याचं दिसलं. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा गोष्टींना खतपाणी घालणं एक गंभीर बाब आहे. त्या शिवाय अशोक खरात सोबत त्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचे आरोप झाले. अखेरीस रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मागच्या आठवड्यात त्यांनी शासनाशी संबंधित असलेल्या या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला. राजीनामा देताना रुपालीच चाकणकर यांनी व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं. अशोक खरात प्रकरणाचा त्यांनी राजीनाम्यात उल्लेख केला नाही.
दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बैठक होत असते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी आणि अनेक आमदारांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाला डाग लागतोय. पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा सुरु आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी आमदार आणि नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात आहे.










