रोजगार ते जागतिक शक्ती नरेंद्र मोदींचा मोठा संकल्प

स्वातंत्र्यदिनी मोदींचे देशाला संबोधन, जीएसटी, युवकांबरोबरच देशासाठी महत्वाच्या या घोषणा

दिल्ली – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना काही महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत. यामुळे अनेक सकारात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या दिवाळीत जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मोदींनी केली. यामुळे देशातील जनतेला कमी कर भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे देशातील युवकांसाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंदाची बातमी दिली आहे. देशातील युवकांसाठी १ लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत. पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना आजपासून सुरू करण्यात आली असून या योजनेतंर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला-मुलींना सरकारकडून १५,००० रुपये देण्यात येणार आहे. यामुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वासही मोदींनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे. तसेच या योजनेअंतर्गत पुढील २ वर्षात ३.५ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’असे या योजनेचे नाव आहे. आज जगभर तंत्रज्ञानाबद्दल चर्चा आणि विकास होत आहे. देशात सेमीकंडक्टरबद्दल चर्चा होत होती, त्यामुळे वर्षाच्या अखेरीस आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणू, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला आहे.

नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली आहे. ही एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, ती केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेलच असे नाही तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देखील देईल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.