
सायबर क्राईम विरोधात ‘डिजिटल वॉरफेअर’ मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन, फडणवीस यांची व्हिजन मुलाखत

मुंबई – मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था संपूर्ण विकसित झाली असून मुंबई चित्रनगरीचा येत्या चार वर्षात संपूर्णपणे कायापालट करण्यात येईल. चित्रपट क्षेत्रासाठी निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक सुविधासह चित्रपटनगरीचा हा विकास असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ कार्यक्रमात अभिनेते अक्षय कुमार यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रनगरीच्या विकासाबाबत प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिनेमाच्या आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मुंबईचे महत्त्वपूर्ण स्थान असून येथे चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था विकसित झाली आहे. सळसळत्या उत्साहाने भारावलेल्या या क्षेत्रातील निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक संकलन, चित्रीकरण याचे संबंधित तंत्रज्ञान याचा मोठा विस्तार झाला आहे. मुंबई शहरालगत कर्जत, मीरा-भाईंदर असे अनेक ठिकाणी चित्रीकरणासाठी स्टुडिओ निर्माण झाले आहेत. विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या या चित्रपट उद्योगाला आधुनिक रूप देण्याचे काम येत्या काळात चित्रनगरीच्या माध्यमातून केले जाईल. चित्रपट क्षेत्रातील विखुरलेल्या घटकांसाठी सुविधा व कायापालटाद्वारे चित्रनगरीला आयकॉनिक स्वरूप देण्यासाठी पावले टाकली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आशयघन व दर्जेदार मराठी चित्रपट आणि मराठी नाटके दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून त्यातील प्रयोगशिलता आणि अभिनव निर्मितीमुळे सक्षम ठरत आहे. मराठी चित्रपटाला सिनेमागृह न मिळण्याचा काळ मागे पडला असून आता एकाच वेळी दोन-दोन मराठी सिनेमे प्रदर्शित होतात आणि हाउसफुल होतात असे सांगून नटरंग, सखाराम बाईंडर यासह आताच्या दशावतार या चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी त्यांनी मुंबई शहरातील रस्ते विकास कामे, पोलीस दल, पायाभूत सुविधांची कामे, भुयारी मार्ग, मेट्रो, शहरातील वाहतूक व्यवस्था या अनुषंगाने प्रश्नांची उत्तरे देत, मुंबई शहरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर 59 मिनिटात शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावर जाता येईल, मुंबईकरांच्या प्रवास वेळेत बचत होईल, असे सांगितले.
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी मुंबईत चित्रपट मुहूर्तमेढ रोवली. आज पर्यंत असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांनी भावनाप्रधान कथानकातून प्रेक्षकांच्या मनामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य दर्शकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आत्ताच्या पिढीस ( gen – z) भावणारे व आवडणारे चित्रपट देण्यासाठी प्रयत्न केले जावेत. यातून ते चित्रपटांशी जोडले जातील.









