खासदारांची पगार वाढली! आता किती पगार मिळणार?

खासदारांच्या पगारात २४ टक्के वाढ, माजी खासदारानांही होणार फायदा, तिजोरीवर किती भार पडणार?

दिल्ली – केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या वेतनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला असून यासोबतच माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. संसदीय कार्य मंत्रालयाने सोमवारी या संदर्भात गॅझेट नोटिफिकेशन जारी केले असून ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.

नवीन निर्णयानुसार लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचे वेतन १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. तसेच त्यांना मिळणाऱ्या दैनंदिन भत्त्यातही वाढ करण्यात आली असून तो २ हजार रुपयांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे. याशिवाय माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती. ती आता ३१,००० रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. तसेच पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या माजी खासदारांना अतिरिक्त पेन्शन २००० रुपयांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आली आहे. भारतातील खासदारांना कार्यालयीन भत्ता, मतदारसंघ भत्ता, मोफत प्रवास आणि सरकारी निवासस्थान यांसारखे काही भत्ते आणि विशेषाधिकारदेखील मिळतात. पगारवाढीमुळे सरकारचा सर्व ७८८ खासदारांवरचा (लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २४५) एकूण वार्षिक खर्च ३,३८६.८२ कोटी रुपये होणार आहे.

मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. जगभरातील काही देशांच्या तुलनेत भारतीय खासदारांचे वेतन खूपच कमी आहे. सुविधा आणि भत्ते जोडले तरीही ते अमेरिका, जपान किंवा सिंगापूर सारख्या देशांपेक्षा कमी आहे.