खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान, राजकीय समीकरणे बदलणार? काय चर्चा झाली?

दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसद भवनात दोघांची भेट झाली. याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या भेटीकडे अनेकांचं लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. प्रत्येक पक्षाकडून यासाठी रणनीती आखली जात आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष या निवडणुकीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. पण आजच्या भेटीबद्दल सुळे यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी पंतप्रधान मोदींना भेट दिली. सुळे यांनी याबाबत सोशल मीडियावर लिहिताना, ‘देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राच्या कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी त्यांना भेट दिली. भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार,’असं नमूद केलं. परंतु ही भेट फक्त हस्तकलेच्या सन्मानापुरती मर्यादित आहे का? की त्यामागे मौन राजकारणाचे धागे विणले जात आहेत? असे सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. दरम्यान या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, प्राथमिक माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांनी आपल्या बारामती मतदारसंघातील काही प्रलंबित प्रश्न आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांविषयी पंतप्रधानांशी चर्चा केली असावी, असे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा उघड संघर्ष आहे. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले असले, तरी शरद पवार गट स्वतंत्रपणे विरोधी बाकावर आहे. याच वेळी सुप्रिया सुळे यांची अशी एकाकी भेट… राजकीय समीकरणांमध्ये नवीन संकेत देणारी ठरते का, हे लवकरच स्पष्ट होईल.