खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

पहिल्याच टर्ममध्ये ‘या’ पदावर झाली निवड, पराभूत होऊनही मिळाले दोन बहुमान, कोणते ते पहा

पुणे – राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर अजित पवार गटाकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. पण आता त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , प्रफुल पटेल यांनी पवार यांचे अभिनंदन केले आहे. सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत आपले चांगले वजन निर्माण केले आहे. कारण खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जनपथ मार्गावरील ११ क्रमाकांचा बंगला देण्यात आला आहे. याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही निवासस्थाने आहेत. सुनेत्रा पवार यांची खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांना दुसऱ्या क्रमाकांचा दर्जा असलेला टाइप ७ प्रकाराचा बंगला देण्यात आला असून हा बंगला शरद पवार यांच्या ६ जनपथ या बंगल्याच्या समोर आहे. शरद पवार हे टाइप ८ दर्जाच्या बंगल्यात सध्या राहत असून त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेही याच बंगल्यात राहतात. दरम्यान राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी तालिका अध्यक्ष हे पद फार महत्वाचे आहे.

लोकसभेत सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. येथे नणंद विरुद्ध भाऊजई अशी लढत झाली होती. या लढतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. तर, सुप्रिया सुळे चाैथ्यांदा लोकसभेत गेल्या आहेत. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा खासदार पदाची जबाबदारी दिली होती.