आईने ६ वर्षाच्या मुलीला कार्टून लावून दिलं ; धाकट्या मुलाकडे लक्ष देऊन बाहेर आली अन्…..

लहान मुलं आणि त्यांचे खेळ याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष ठेवण्याची गरज आहे. एका ६ वर्षाच्या चिमुकल्या जीवाचा अचानक मृत्यू झाल्याने सांगली परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगली शहराधील सावंत प्लॉट भागात राहणाऱ्या एका ६ वर्षीय मुलीचा खेळता-खेळता कापडी बेल्टने गळफास बसून दुर्दैवी मृत्यू झालाय. अंजली नितीन खांडेकर असे या चिमुरडीचे नाव आहे. खेळता-खेळता कापडी बेल्टने गळफास बसून या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. वैद्यकीय तपासणीतही मुलीचा गळफास बसून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहते. नितीन खांडेकर हे मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि दोन वर्षाचा मुलगा आहे.

अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. वडील नितीन हे गावाकडे गेले होते. घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण होते. दुपारी चारच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती. थोड्या वेळाने आई बाहेर आली तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलवले. अंजलीला खुंटीवरून खाली काढले. त्यानंतर तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनं खांडेकर कुटुंबावर शोकाचं वातावरण पसरलं. अंजलीचा असा अंत होईल याची कल्पनाही घरच्यांनी केली नव्हती.