मोदी सरकार जम्मू काश्मीर राज्याचे नाव बदलणार?

दिल्ली – देशात भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक ठिकाणाचे नाव बदलण्यात येत आहे. अनेक शहरांची आणि रस्त्यांची नावे सरकारने बदलली आहेत. आता काश्मिरचे देखील नाव बदलण्याचा विचार सरकार करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत आज सुचक वक्तव्य केले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी दिल्लीत ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शहा यांनी काश्मीरचे नाव कश्यप होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. यावेळी बोलतांना शाह म्हणाले की, काश्मीरचं नाव कश्यपपासून असू शकते. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की, भारतीय संस्कृतीचा पाया काश्मीरमध्ये घातला गेला. इथं सुफी आणि बौद्ध संस्कृतीही खूप चांगल्या पद्धतीने रुजली गेली. काश्मिरी, डोगरी, बाल्टी, झंस्कारी या भाषांना सरकारने मान्यता दिली आहे, याबद्दल शहा यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. याचे ऐतिहासिक पुरावे या पुस्तकात दिले आहेत. काही लोकांनी काश्मिरला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता तो अडथळाही हटवण्यात आला. काश्मीरमध्ये जी मंदिरं मिळाली आहेत, त्याचा उल्लेख पुस्तकात आहे, त्यामधून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दिसून येते, असे शाह म्हणाले आहेत.

कमल ३७० ने काश्मीरमधील तरुणांमध्ये फुटीरतावादाची बिजे रोवली. कलम ३७० ने भारत आणि काश्मीरमधील एकोप्याला तोडले त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद बोकाळला. मात्र आता कलम ३७० हटवण्याने काश्मीरमधील दहशतवादी कारवाया घटल्या आहेत, असा दावा अमित शहा यांनी केला आहे.