मोदी सरकारकडून राष्ट्रीय शेठला कल्याणची ४५० एकर जमीनही बहाल

अदानीच्या सिमेंट कंपनीसाठी सर्व नियमही बदलले, मोदी सरकारने गरिबांच्या जमिनी हिरावून लाडक्या अदानीला दिल्या

मुंबई – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी कुळकायदा, सिलिंग ऍक्ट आणून जमीनदारांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरिब जनतेला दिली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून लाखो भूमिहिनांना जमीन मिळवून दिली. आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार राष्ट्रीय शेठसाठी गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

कल्याण येथील अदानीच्या सिमेंट कंपनीला स्थानिकांचा विरोध असून त्याविरोधात आंदोलन सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईचे वितानतळ, धारावी, मदर डेअरी, देवनारची जागा मोदी सरकारने लाडक्या मित्राला दिली, त्यानंतर वाढवण बंदराच्या नावाखाली पालघर देऊन टाकले व आता कल्याणमधील ४५० एकर जमीन राष्ट्रीय शेठच्या सिमेंट कंपनीसाठी दिली. फक्त जमीनच दिली नाही तर या सिमेंट कंपनीसाठी पर्यावरणासह सर्व नियमच बदलून टाकले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. ही सिमेंट कंपनी स्थानिकांच्या जीवावर उठलेली असून स्थानिकांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी, दबाव आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवला आहे. या प्रश्नी काँग्रेस पक्ष विधानसभेतही आवाज उठवेल, असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई व कल्याणचे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते पगारे मामा यांच्यावर हल्ला करणारी प्रवृत्ती ही मनुवादी आहे. या मनुवादी वृत्तीला न घाबरता चोख उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हात लावण्याचे धाडस कोणी केले तर त्याच्यापाठीमागे सर्वशक्तिनीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली. यावेळी पगारे मामा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी खांद्यावर उचलून स्टेजवर नेले आणि देशाचे संविधान, गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन सत्कारही करण्यात आला.

उल्हासनगर काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड, गणेश पाटील, माजी खासदार सुरेश टावरे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, अजिंक्य देसाई, कल्याण शहराध्यक्ष सचिन पोटे, राजाभाऊ पातकर, उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे आदी उपस्थित होते.