
बीड – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी याबाबत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली, पण मुंडे यांच्यावर आरोप करताना त्यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. पण त्यामुळे आमदार धस यांच्या अडचणी वाढल्या आहेत.



अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्राजक्ता माळी म्हणाली, की सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. सगळं ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. एका सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना काढलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट. हे एका शब्दाचं एकमेव संभाषण… यावर एवढी आवई उठावी? त्याला मी काय प्रत्युत्तर देऊ? मी जेव्हा त्या गोष्टीवर भाष्य करते, तेव्हा १० लोकापर्यंतची गोष्ट हजार लोकांपर्यंत पोहोचते. ती गोष्ट खोटी असेल तर ती किती काळ टिकणार? म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आज मला स्पष्टीकरण देण्याची गरज पडावी ही नामुष्की आहे. कारण एक लोकप्रतिनिधी त्यावर टिप्पणी करतात. एखादी अफवा आहे. त्याविषयी जेव्हा लोकप्रतिनिधीआपल्यावर चिखलफेक करतात, तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावीशी मला वाटली, असं प्राजक्ता माळी म्हणाली आहे. त्याचबरोबर बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याविषयी चर्चा करताना कलाकारांवर गाडी का घसरते. तसेच महिला कलाकारांचीच नावे का येतात. बीडमध्ये कधी पुरुष कलाकार कार्यक्रमाला गेला नाही का? त्यांचे नाव का येत नाही, असे बोलून धस यांनी स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी असे कुत्सित वक्तव्य केल्याचा आरोप प्राजक्ता माळी हिने केला आहे. तसेच राजकारण्यांनी वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या लोकांच्या नावाचा गैरवापर करणे थांबवावा असेही प्राजक्ता माळी म्हणाली आहे.

मी कुठेही घसरलेलो नाही. प्राजक्ता माळी यांनी माझे कालचे विधान पुन्हा एकदा ऐकावे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्ररणापासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न आहे. माझ्या ठायी विषय संपला आहे, मी माफी मागणार नाही, असे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावर काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.










