अंदाज हुकला आणि गळफास लागला ; दोराचा फास लागून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे. भावडांसोबत खेळत असताना एका ७ वर्षांच्या मुलीला दोरीचा फास लागला. भावडांना ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.

रविवार असल्याने मुलांचा दंगा सुरु होता. घरातील वडीलधारी मंडळी बाहेर असल्याने इतर मुलांसोबत त्यांची मस्ती सुरु होती. बैंगवाडी येथे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास आकृती सिंह ही तिची भावंडे आणि शेजारील एका मुलीबरोबर लपाछपी खेळत होती. लपाछपीचा डाव रंगला होता. त्याचवेळी खेळताना दोरीचा फास लागून तिचा मृत्यू झाला. ही घटना गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली.

याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे. घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. त्यामुळे घरात ही चार मुले होती. त्यांचा लपाछपीचा डाव सुरु होता. घरात वेगवेगळ्या भागात ही भावंडे लपली होती. तर मुलगी पोटमाळ्यावर लपली होती. हा खेळ सुरु असतानाच पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास मुलीच्या गळ्यात अडकला. मुलीचा पोटमाळ्यावरुन उतरताना दोरीचा अंदाज आला नाही. उतरण्याच्या गडबडीत फास तिच्या गळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

ही बाब लक्षात येताच या मुलीच्या मोठ्या बहिणीने तत्काळ घराबाहेर धाव घेत शेजाऱ्यांना घटना सांगितली. शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली. तिला खाली घेत परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. शिवाजी नगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे मुलीच्या भावडांना मोठा धक्का बसला.