
स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी, राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली – स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा-भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनामध्ये (ठाणे जिल्हा) मिरा भाईंदर महानगर पालिकेने 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त राधा बीनोद शर्मा त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले. कराड नगरपालिकाने 50 हजार ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले आहे. हा पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह मुख्य अधिकारी प्रशांत वटकर यांनी स्वीकारला. 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गटात ( ठाणे जिल्हा ) नवी मुंबई महानगरपालिकेने “सुपर स्वच्छ लीग सिटी” पुरस्कार पटकावला आहे. पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्वीकारला. 50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात (पुणे जिल्हा) लोणावळा नगरपालिकाने, 20,000 ते 50,000 लोकसंख्येच्या गटात ( सांगली जिल्हा) विटा नगरपालिकाने, ( पुणे जिल्हा) सासवड नगरपालिका आणि ( अहिल्यानगर जिल्हा)देवळाली प्रवरानगर नगरपालिका , तर 20,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात ( सातारा) पाचगणी नगरपालिका आणि (कोल्हापूर) पन्हाळा नगरपालिका या शहरांनी सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळवले (पुणे जिल्हा) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ७ स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस ही दोन्ही मानांकनंही मिळवली आहेत. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महानगरपालिका, नगरपालिकांच्या टीमसह पुरस्कार स्वीकारले.
स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम २०१६ पासून केंद्र शासनाने सुरू केला. हा उपक्रम शहरी स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ बनला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध शहरांनी दाखवलेली कामगिरी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत असून, स्वच्छतेच्या दिशेने ही वाटचाल भविष्यातही वेगाने सुरू राहील, अशी अपेक्षा नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केली.









