कट्टर विरोधकांची शिवनेरीवर भेट,अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पक्षप्रवेश केलेले शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू आहे. हे दोन्ही नेते आता शिरुर लोकसभा मतदारसंघातून आमनेसामने येणार आहे. अशातच आज दोन्ही नेते निवडणुकीपूर्वी एकमेकांसमोर आल्याचे यला मिळाले. यावेळी चक्क अमोल कोल्हे यांनी अढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. यानिमित्ताने अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अढळराव पाटील हे दोन्ही किल्ले शिवनेरी येथे आले होते. दोन्ही नेते समोरासमोर आल्यावर त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. यावेळी अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. अढळराव पाटील यांनीही अमोल कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या आरोग्याची विचारणा केली. या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अढळराव पाटील यांच्या भेटीबद्दल माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, ते वयाने मोठे आहेत. आपली संस्कृती आहे की, समोर वयस्कर व्यक्ती आली की मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे, हे पाहू नये. सध्या द्वेषाचे राजकारण सुरू झालेलं आहे. त्यामुळे या पलिकडे जाऊन सर्वांनी राजकारणात सुसंस्कृतता जपली पाहिजे, असं अमोल कोल्हे म्हणाले. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, आज शिवनेरीवर नतमस्तक होऊन महाराजांकडे सर्वसामान्य माणसासाठी जे रयतेचे राज्य जे शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणले होतं त्या सर्वसामान्य रयतेसाठी लढण्यासाठी बळ द्या, अशी मागणी केली आहे. तर अमोल कोल्हेंच्या भेटीबद्दल बोलताना अढळराव पाटील म्हणाले की, हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठांना पायाला स्पर्श करण्याची प्रथा आहे. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शिवाजीराव अढळराव पाटील यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. यानंतर अजित पवार यांनी खेडचा दौरा करत दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली आणि या दोघांमध्ये दिलजमाई घडवून आणली. त्यामुळे अढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता. याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आता शिरुरमध्येही पवार विरुद्ध पवार अशी लढत यला मिळणार आहे. कारण शरद पवार गटाने शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे.