कुंजीरवाडीत प्रचारादरम्यान माऊली कटकेंची अशोक पवार यांच्यावर जोरदार टीका; म्हणाले, ‘त्यांनी फक्त खोटे बोला अन…

प्रतिनिधी  गौरव कवडे -शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेलीत प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. ज्ञानेश्वर कटके यांचे कुंजीरवाडी (ता. हवेली) चौकात फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील हनुमान मंदिराजवळ एक छोटेखानी सभा झाली. यावेळी शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके विजयी भव होणारच.असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले आहे.

यावेळी बोलताना ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, शिरूर व हवेली तालुक्यात २००९ सालापासून शेतकरी, नोकरदार, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या आहे. तर पुणे सोलापूर व पुणे नगर रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र नागरिकांच्या या समस्यांकडे विद्यमान आमदाराने दुर्लक्ष केले आहे. त्यांनी फक्त खोटे बोला अन रेटून बोला अशी भूमिका मांडली आहे. महायुती सरकारकडून आम्ही अनेक विकासकामे आणली आहेत. मात्र या महाशयांनी अधिकाऱ्यांना फोन करायचा. या कामांची माहिती घ्यायची आणि आम्ही कामे आणले म्हणून कार्यसम्राट आमदार म्हणून पोस्ट टाकायच्या. अशी त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याची कामे केली आहेत.

घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. २२ हजाराहून अधिक सभासद व कामगार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. समाज आपल्याला निवडून देत असतो. त्यामुळे आपण समाजहिताचे काम केले पाहिजे. तुम्ही कुणाच्या परडीत एक रुपया टाकता तरी कधी आमच्या उज्जैन देवदर्शन घडवून आणल्याबद्दलच्या बाता मारता. उज्जैन तर झाकी होती अयोध्या और काशी अभी तो बाकी है!