मराठवाड्याला पावसाचा हाहाकार, लाखो हेक्टर पीक पाण्यात

अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा, अडकलेल्या नागरिकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश

मुंबई – मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. या अवेळी आलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले असून शेतीतलाव, ओढे, नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच मोठ्या वित्तहानी देखील झाली आहे.

लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून असून, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव व संचालकांशी बोलून त्यांना सूचनाही दिल्या. मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा आणि वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असेही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सलग झालेल्या पावसाने तब्बल ५ हजार ३२० गावांतील २० लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. फक्त मागील नऊ दिवसांतच सुमारे ४ लाख ९१ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.