मुंबई – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा आंदोलनाने चांगलाच जोर पकडला होता. त्यावेळी ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला होता. पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा आमदारांची संख्या घटली असून ओबीसी आमदारांची संख्या वाढली आहे.मराठा आमदाराची संख्या घटली असून ओबीसी आमदारांची संख्या दुपटीने वाढली आहे.
मागच्या म्हणजे २०१९ च्या विधानसभेत ११८ सर्वपक्षीय मराठा आमदार होते. ती संख्या आता १०४ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत ४० ओबीसी आमदार निवडून आले होते. ती संख्या आताच्या निवडणुकीत कुणबी-मराठा आमदारांसह ७८ झाली आहे. यातही भाजपाने बाजी मारली आहे. पक्षनिहाय ओबीसी आमदार पहायचे झाल्यास भाजप ४३, शिवसेना शिंदे गट १३, राष्ट्रवादी अजित पवार गट ९, काँग्रेस ४, राष्ट्रवादी शरद पवार गट ३, शिवसेना ठाकरे गट ३ व इतर पक्ष ३ असे विधानसभेत एकूण ७८ ओबीसी आमदार आहेत. ओबीसी प्रवर्गाच्या राज्य यादीत एकूण ४०९ जाती आहेत. पण निवडून आलेल्या आमदारांमध्ये कुणबी, कुणबी- मराठा, तेली, आगरी, धनगर, वंजारी, बंजारा, माळी या जातींचे वर्चस्व आहे. १९६२ साली फक्त २२ ओबीसी आमदार निवडून आले होते. पण आता ही संख्या ७८ वर पोहोचली आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे आणि ओबीसीत समावेशाच्या मागणीमुळे ओबीसी समाज एकत्र आला होता. त्यामुळे यंदा ओबीसी आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नवीन विधानसभेत कोणाचे किती आमदार
मराठा १०४, ओबीसी ७८, मुस्लीम १०, मारवाडी ९, ब्राह्मण ६, गुजराती ४, लिंगायत ४, सीकेपी ३, जैन ३, उत्तर भारतीय ३, जीएसबी २, कोमटी २, सिंधी १ असे जातनिहाय प्रतिनिधित्व आहे. याखेरीज चर्मकार १, आदिवासी २ असे तिघे जण राखीव नसलेल्या जागांवर निवडून आले आहेत.