नाशिकच्या जागेवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून उमेदवार ठरलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गट आक्रमक झाला आहे. तसेच अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु, भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास सकल मराठा समाज येथे आपला अपक्ष उमेदवार देणार आहे. मराठा आरक्षणाला विरोध करत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर वेळोवेळी जहरी आणि अवमानकारक टीका केली होती. त्याचा वचपा आता काढण्यासाठी सकल मराठा समाज सरसावल्याचे दिसत आहे.
सकल मराठा समाजाने नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील शेवंता लॉन्समध्ये निवडणुकीसंबंधी बैठक घेतली. या बैठकीत नाशिक मतदारसंघातून भुजबळ किंवा त्यांचा पुतण्या उमेदवार असल्यास, सकल मराठा समाजही मराठा उमेदवार मैदानात उतरवणार आहे, असा निर्णयच घेण्यात आला. या बैठकीचा सकल मराठा समाजाने मनोज जरांगे यांना पाठवला आहे. तसेच मराठा उमेदवाराची चाचपणीही सुरू केली आहे. त्यामुळे, नाशिकमध्ये भुजबळ यांना नाशिकमधील उमेदवारी सोपी असणार नाही.