पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत मराठा बांधव आक्रमक ; व्हीव्हीआयपी रांगेत दिल्या ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा, गोंधळाचे वातावरण

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा सुरू हाेती. व्हीव्हीआयपी रांगेत बसलेला एक तरुण अचानक उठला आणि मराठा आरक्षणासाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ची घोषणा देऊ लागला.

पोलिसांनी त्याला आवरले आणि खाली बसण्याची विनंती केली. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षारक्षकांची धांदल उडाली. पोलिस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन त्याला शांत करून सभा स्थळावरून दूर नेले. या प्रसंगामुळे सभेतील व्हीव्हीआयपी रांगेत काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठा आरक्षणावरून मागील काही महिन्यांपासून वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर रॅलीही झाल्या आहेत. अनेक ठिकाणी मराठा समाज आरक्षणासाठी एकवटल्याचे दिसून आले आहे. जरांगे पाटलांनीही आगामी विधानसभेत आरक्षणावरून रणशिंग फुंकले आहे. आरक्षणाबाबत सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने तुम्ही सरकारच्या उमेदवारांना पाडा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. अशातच पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत असाच मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता निवडणुकीनंतर येणारे सरकार मराठा आरक्षणाबाबत काही फेरविचार करणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.