मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण…

मुंबई – राज्याच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर दिपक केसरकर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला, त्यांची मला कीव वाटते असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षातील मंत्री उदय सामंत यांच्यावर टिका केली आहे.

दिपक केसरकर म्हणाले की, अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो, मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन, मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत . त्यामुळे जी मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आनंदात आहे. यावेळी रामटेक बंगल्याबाबत प्रश्न विचारल्यावर रामटेक बंगल्यात जे जे राहीले ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले असल्याचे सांगत शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील नीलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मी यापेक्षाही मोठ्या पदावर जाईन असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच यावेळी रिफायनरीच्या मुद्यावरून दिपक केसरकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावला आहे. उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पुर्ण जगभराची माहीती आहे, असा टोला दिपक केसरकर यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश योजनेचा निर्णय दीपक केसरकर यांनी घेतला होता. त्यात आता बदल होणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले आहे. त्यावरून केसरकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा तरी करायला हवी होती, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.