मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत बेमुदत उपोषण सुरू

आंदोलनाला एक दिवसाची परवानगी, जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर ठाम, आझाद मैदानावर मराठा समाज एकवटला

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांनी यापूर्वी २९ ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आझाद मैदानाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. मराठी समाजाच्या आरक्षणासाठी ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. कोर्टाने जरांगे यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती, मात्र पोलिसांनी काही अटी घालून त्यांनी फक्त एक दिवस आंदोलनाची परवानगी दिली. पण आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करणारच असे म्हणत मनोज जरांगे पाटील हे मात्र आंदोलनावर ठाम आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे. न्यायालयाने जे सांगितले त्याप्रमाणे आम्हाला करावे लागेल. त्यानंतर आझाद मैदानावर उपोषणाला केवळ एक दिवसाची परवानगी देणे म्हणजे मराठा समाजाचा जाणूनबुजून अपमान आहे. यातून काहीही साध्य होऊ नये असा सरकारचा उद्देश दिसतो. सरकारने मोठे मन दाखवून मराठ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणाला कायमस्वरूपी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यातून समाजात नाराजीची लाट उसळली असून, याचा संदेश राज्यभर गेला आहे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांना पाच हजार आंदोलकांची आणि आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे म्हणून जरांगे पाटील मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्यावर ठाम असल्याने आता या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना ओबीसीतुन आरक्षण मिळू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायिक संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन आंतरवली सराटी गावातून सुरू केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी उपोषण, आंदोलनाचे नेतृत्व केले. या चळवळीला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून त्यांनी “मुंबई मोर्चा”ची घोषणा केली होती.