विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मोठी घोषणा रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये केली. मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार, राखीव जागांवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, जिथे ताकद नसेल अशा ठिकाणी आपल्या मागण्या मान्य असल्याचे जो उमेदवार ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल, त्याला पाठिंबा देणार, अशी तिहेरी सूत्र सांगणारी भूमिका जरांगे पाटील यांनी शेकडो कार्यकर्ते आणि इच्छुकांच्या उपस्थितीत जाहीर केली.तसेच निवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत.
यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल. ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले. जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे महायुतीची विशेषत: भाजप आणि विरोधी बाकावर बसणाऱ्या मविआच्या नेत्यांचीही चिंता वाढणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, दाखल गुन्हे मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मागील दीड वर्षापासून लढा उभा केला आहे. लाेकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला.
या पार्श्वभूमीवर समाजातील राजकीय, सामाजिक, कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर लढायचे की पाडायचे याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.जिथे आपली ताकद आहे, अशा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे. आपल्या ताकदीचे गणित पाहणे गरजेचे आहे. समीकरण जुळवणे महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळले तर अवघड आहे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. एखादी गाडी चांगली असते परंतु, ड्रायव्हर गाडी नीट चालवित नाही आणि ती झाडावर धडकते तशी स्थिती भाजपची आहे. भाजप चांगली आहे, परंतु चालविणारा चांगला नाही, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. विविध मुद्द्यांवरून जरांगे-पाटील यांनी या बैठकीत फडणवीस यांच्यावर धारदार टीका केली.