
सरकारने परवानगी देताना घातल्या जाचक अटी, ही अट ठरणार डोकेदुखी, काय आहेत अटी-शर्ती?

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला आझाद मैदानावर परवानगी मिळाली आहे. पण त्याचबरोबर आठ अटीदेखील घालण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र ही परवानगी काही अटी व शर्तींसह देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी आंदोलनासाठी केलेल्या मागणीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी ही परवानगी दिली आहे.
१. आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.’
२. ठराविक वाहनांनाच परवानगी असेल. वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलीसांच्या सल्ल्याने करावी लागेल. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्रीवेवरून वाडीबंदरपर्यंत येतील. त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त 5 गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. बाकीच्या गाड्या पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील.
३. आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोकच सहभागी होऊ शकतात. आझाद मैदानासाठी सात हजार चौ. मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांनाच सामावून घेऊ शकते. त्याच दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिली असल्याने त्यांचा हक्क अबाधित राहील.
४. आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही.
५. परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
६. आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
७. आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे.
८. आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही. आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करू नये.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना ज्या अटी घातल्या आहेत त्या मान्य आहेत. मात्र, एका दिवसाची अट मान्य नाही.









