मोबाईल कंपनीचे टॉवरवरील रिमोट रेडिओ युनिटची चोरी करणाऱ्याला अटक ; ५ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त

मोबाईल कंपनींच्या टॉवरवरील महागड्या रिमोट रेडिओ युनिटची चोरी करणार्‍या दोघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या साथीदाराला पकडून त्याच्याकडून ५ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.दिलशाद मोहमद रफिक (वय ३२) असे तिसर्‍या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल कंपनीने धनकवडीतील संभाजीनगर येथील केदार अपार्टमेंट व साईकृपा सोसायटी येथे मोबाईल टॉवर बसवले होते. या टॉवरवर एका कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी रिमोट रेडिओ युनिट असे एकूण ९ नग मशीन बसविल्या होत्या. चोरट्यांनी त्या चोरुन नेल्या होत्या. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी अक्षय शांताराम बोडके आणि अशिष अशोक शिंदे यांना अटक केली होती. सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक दही हंडीनिमित्त मंगळवारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना बातमी मिळाली की, मोबाईल टॉवरवरील किंमती मशीन चोरी करणारा एक जण के. के. मार्केटच्या पुढे भंगार दुकानाजवळ चोरीच्या रिमोट रेडिओ मशीन पोत्यात घेऊन विक्रीसाठी येणार आहे.

ही बातमी मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तेथे जाऊन दिलशाह रफिक याला पकडले. त्याने साथीदार अक्षय बोडके, अशिष शिंदे यांच्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ५ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड , पोलीस अंमलदार सागर सुतकर, खंडु शिंदे, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, सागर कुंभार, अमित पदमाळे, विशाल वाघ यांनी केली आहे.