सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

मुंबई – पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या १० दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या. पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या ॲम्ब्युलन्ससोबत कार्डियाक ॲम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, याबाबत सूचना मांडण्यात आल्या. सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे येते. याठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेऊन वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी 36 वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटरप्रुफ मंडप वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला असून हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळ्या स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.