विधानसभा निवडणुकीत महायुतीचं आरपीआयकडे दुर्लक्ष? आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले महायुतीवर नाराज, पत्राद्वारे फडणवीसांना कळवली नाराजी

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात येत आहे. सर्व पक्षाचे उमेदवार निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यात येत आहेत. अर्ज दाखल भरण्यासाठी केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र,महायुतीकडून रामदास आठवलेंचा पक्ष आरपीआयला अजून तरी कोणत्याही जागेवर उमदेवार मिळाली नाही. त्यामुळे आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले महायुतीवर नाराज असल्याचे दिसत आहे. आपली नाराजी व्यक्त करणारे एक पत्र रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला एकही जागा न मिळाली नाही याविषयी रामदास आठवले यांनी, “रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळत नाही. हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सांगितलं आहे की, जेव्हा जेव्हा जागावाटपाबाबत चर्चा होते, तेव्हा आम्हाला एकदाही बोलावलं गेलं नाही.” असे त्यांनी म्हटले. रामदास आठवले यांनी, “आम्ही २१ जागांची यादी चंद्रकांत बावनकुळेंना दिली होती, त्यापैकी चार-पाच जागा आरपीआयला देण्याचा निर्णय व्हायला हवा होता. आता फक्त दोन-तीन जागा उरल्या आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन ते तीन दिवस बाकी आहेत आणि अद्यापही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एकही जागा मिळालेली नाही, हा आमच्या पक्षासाठी आणि समाजासाठी मोठा धक्का आहे.” असे देखील म्हटले आहे.

आरपीआय प्रमुख रामदास आठवले म्हणाले की, महायुतीच्या नेत्यांनी आरपीआय कडे एवढं दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही आणि यासाठीच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी विश्वास दिला होता की, भाजपच्या कोट्यातून एक जागा आरपीआयला देण्यात येईल. तसेच, आरपीआयला विधानपरिषदेची जागा दिली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांना दिलं होतं. पण आतापर्यंतच्या जागावाटपात आम्हाला एकदाही चर्चेसाठी बोलावलं नव्हतं.रामदास आठवले यांनी महायुतीसोबत काडीमोड घेण्याबाबतच्या प्रश्नावर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, आरपीआय नेहमीच एनडीएसोबत आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देश विकास करतोय. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांसह सर्वच वर्गांसाठी काम केलं जातंय. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी एनडीए आणि महायुतीसोबत आहे.