
ही डान्सक्वीन लवकरच झळकणार या चित्रपटात, गाणे सोशल मिडीयावर हिट, तरुणाईला भुरळ

मुंबई – डान्सक्वीन गाैतमी पाटील आजही तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. तिच्या डान्सच्या कार्यक्रमाला नेहमीच तुफान गर्दी होत असते. गाैतमी पाटीलने स्टेजबरोबरच मोठ्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला आहे. आता पुन्हा एकदा गाैतमी पाटील एका चित्रपटातून महाराष्ट्राला वेड लावण्यासाठी येत आहे.


‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झालाय. तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गाण्यावर महाराष्ट्राची क्रश गाैतमी पाटील थिरकली आहे. या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात आपल्या ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गौतमी पाटीलचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज अन् सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत प्रेक्षकांना गाण्यावर ताल धरायला भाग पाडत आहे. ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची कथा स्त्री सन्मान, आत्मगौरव आणि संघर्ष याभोवती फिरणारी आहे. त्यात नायिकेची सशक्त लढाई मांडण्यात आली आहे. दरम्यान गाैतमी पाटील आणि सरकार तुम्ही केलय मार्केट जाम हे गाणे म्हणजे समीकरण झाले आहे. नुकतेच बिग बाॅस फेम जान्हवी किल्लेकर आणि गाैतमी यांनी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्याचबरोबर गौतमी पाटील स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ‘शिट्टी वाजली रे’ हा विनोदी कुकींग शो २६ एप्रिलपासून सुरु झाला आहे. अमेय वाघ या शोचा होस्ट आहे.
वामा या चित्रपटात अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल. तसेच चित्रपटात डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. ओंकारेश्वरा प्रस्तुत अन् सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.










