मिसळ प्रेमींसाठी आनंदाची बातमी, मिसळला मिळाला हा मान, हे दोन पदार्थही गाजले
दिल्ली – सकाळी कामावर जाण्याआधी महत्वाचा असतो तो नाष्टा. त्यामुळे भारतात सकाळच्या नाश्त्यात विविध पदार्थ तयार केले जातात. विभाग आणि राज्यानुसार यात बदल होतो. पण आता नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार मिसळला जगात मानाचे स्थान मिळाले आहे.
जगभरातील सर्वोत्तम ५० न्याहरीच्या पदार्थांच्या यादीत चटकदार मिसळीला स्थान मिळाले आहे. खाद्यापदार्थांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विख्यात ‘टेस्ट अटलास’ने न्याहरीची ही जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. यात तीन भारतीय पदार्थांना स्थान देण्यात आले आहे. मिसळ, छोले भटुरे आणि पराठा हे ते तीन पदार्थ होत. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्राच्या झणझणीत मिसळने थेट टॉपमध्ये स्थान मिळवले आहे. मिसळ या यादीत १८ व्या क्रमांकावर आहे. छोले भटुरे या यादीत ३२ व्या क्रमांकावर आहेत. तर या यादीत २३ व्या क्रमांकावर पराठा आहे. भारतातील प्रसिद्ध नाश्त्यामध्ये समोसा, छोले भटुरे, पराठे, इडली डोसा, पोहा, वडा पाव, मिसळ पाव आणि कचोरी यांचा समावेश आहे. हे नाश्ते तुम्हाला देशाच्या कोणत्याही भागात परवडणाऱ्या किमतीत सहज मिळतील. तथापि, आता लोकांना नाश्त्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ खायला देखील आवडतात. परंतु या गोष्टी भारतातील सर्वात लोकप्रिय नाश्त्याच्या यादीत सर्वात वर आहेत. टेस्ट अटलासच्या शंभर पदार्थांच्या यादीत निहारी, श्रीखंड आणि पालक पनीरचा समावेश आहे.
फूड गाईड ‘टेस्ट अटलास’ हे दरवर्षी जगभरातील लोकप्रिय खाद्यपदार्थांवर अभ्यास करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणींमध्ये रँकिंग जाहीर करतात. यंदा त्यांच्या “Top 100 Traditional Breakfast Dishes in the World” या यादीत भारतीय पदार्थांचा ठसा उमटला आहे.