
महाराष्ट्राच्या प्रगतीचा बहुआयामी आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन, सांगितले नियोजन

मुंबई – महाराष्ट्र २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठणार आहे आणि या दिशेने राज्याने ठोस पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे मॉर्गन स्टॅन्ले आयोजित “इंडिया इन्वेस्टमेंट फोरम 2025” मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्ध्या ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे. टाटा सन्स यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन झाली असून, २० वरिष्ठ सीईओंच्या सहकार्याने एक विस्तृत रोडमॅप तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात पायाभूत सुविधा, उद्योग, सेवा, शेती व फिनटेक या क्षेत्रांचा समावेश आहे. याचबरोबर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ आराखड्याचे सादरीकरण २ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन टप्प्यांचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील औद्योगिक ताकद आता केवळ मुंबई-पुण्यापुरती मर्यादित न राहता छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नाशिक, रायगड यांसारख्या भागांत झपाट्याने वाढते आहे. इव्ही हब, स्टील सिटी, व औद्योगिक टाऊनशिपद्वारे संपूर्ण राज्य औद्योगिक महासत्ता बनत आहे. परकीय गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. एकात्मिक डिजिटल “सिंगल विंडो” प्रणाली, एमआयडीसी औद्योगिक पार्क आणि ‘कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट’ यांच्या माध्यमातून गुंतवणूक सुलभ झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशाच्या 40 टक्के आघाडीवर आहे. यानिमित्ताने या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात मोठी क्षमता असून पुढील पाच वर्षांसाठी ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक सहभाग, संरक्षण क्षेत्र आणि पायाभूत सुविधा यांच्यामार्फत पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.









