
विश्वविजेत्या दिव्या देशमुखचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन, शासनातर्फे होणार सन्मान

नागपूर – नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून ‘ग्रँड मास्टर’ हा किताब मिळविला आहे, त्यांची ही कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगून राज्य शासनाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रामगिरी शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दिव्या देशमुख यांनी भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी यांना जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करून ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन करत दिव्या देशमुख यांनी दुसऱ्यांदा या स्पर्धेत सहभाग घेत यशोशिखर गाठल्याचे त्यांनी सांगितले. दिव्या देशमुख यांनी वयाच्या १९ व्या वर्षी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धेत २३ सुवर्ण पदकांसह जवळपास ३५ पदके पटकावली आहेत. दिव्या देशमुख यांच्या या कामगिरीचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान दिव्या आणि हम्पी या बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरील या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या चालींकडे अवघ्या बुद्धिबळ जगताची नजर खिळली होती, हा देखील भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी अपूर्व आणि अभिमानास्पद योग असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.
महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रॅण्ड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावली आहे. विशेषतः महाराष्ट्राची पहिली ग्रॅण्ड मास्टर.. विश्वविजेती म्हणून महाराष्ट्राचे नाव बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरही सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे.









